डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्थात विद्यार्थी दिनाची कर्मकहाणी
महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी खास परिपत्रक
जारी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर हा
विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. खरे तर हा एक
क्रांतिकारी निर्णय असून याचे अत्यंत दूरगामी परिणाम संपूर्ण भारताच्या
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर होणार आहेत.
.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे १८९४ मध्ये
सैन्याच्या नोकरीतून निवृत्त झाले. त्यावेळी ते “कॅम्प दापोली” येथे राहत
होते. त्यांनी १८९६ मध्ये दापोली सोडले आणि सातारा येथे गेले. भीमराव
त्यावेळी लहान असल्याने त्यांना शाळेत प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे
त्यांचे मूलभूत शिक्षण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घरीच झाले. शेवटी ७
नोव्हेंबर १९०७ मध्ये त्यांचे नाव साताऱ्याच्या जुना राजवाडा येथील सातारा
हायस्कूलमध्ये (अर्थात आजच्या प्रतापसिंग हायस्कूल मध्ये) टाकण्यात आले.
त्यांना इयत्ता पहिलीच्या इंग्रजी वर्गात प्रवेश देण्यात आला. इसवी सन १९००
ते १९०४ ही बाबासाहेबांच्या बालपणीची चार वर्षे या शाळेत गेली.
.
छत्रपती
राजाराम महाराज (दुसरे) यांचे नातू छत्रपती प्रतापसिंग भोसले महाराज यांनी
सातारा भागात १८०८ ते १८३९ पर्यंत राजे म्हणून काम पाहिले. साताऱ्यात
शिक्षण, वाचन संस्कृती चळवळ सुरु करण्याचं काम छत्रपती प्रतापसिंह
महाराजांनी केलं होतं. त्या काळात त्यांनी पुणे-सातारा मार्ग, सातारा
महाबळेश्वर मार्ग बांधले, तसेच नगर वाचनालय व ही शाळा सुरु केली होती. ही
शाळा सुरुवातीला रंगमहाल येथे होती. १८७१ मध्ये या शाळेचे रुपांतर माध्यमिक
शाळेत झाले. आधी ते गव्हर्नमेंट व्हर्न्याकुलर स्कूल व सातारा हायस्कूल
म्हणून ओळखले जाई. १८७४ मध्ये ते सध्याच्या जुना राजवाडा या भागात भरू
लागले. ते आता प्रतापसिंग हायस्कूल म्हणून ओळखण्यात येते. या शाळेतून अनेक
मोठमोठी व्यक्तिमत्वे आकाराला आलीत. त्यात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ञ कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोळकर, सर्वोच्च
न्यायालयाचे प्रसिद्ध न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, इंग्लंड मधील
भारताचे राजदूत आप्पासाहेब पंत, कुलगुरू शिवाजीराव भोसले, रंग्लर परांजपे
अशी काही नावे सांगता येतील.
.
७
नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेबांच्या आयुष्यात अत्यंत मोलाचा दिवस आहे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञान,
कौशल्य व कृती यांच्या जोरावर भारतीय समाजात क्रांती घडविली. जगातील
अत्युत्तम संविधान भारताला देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकाराची पायाभरणी या
शाळेत झाली होती. वंचित, श्रमिक, महिला, शेतकरी इत्यादींसाठी अनेकाविध
क्षेत्रात झटणारा भीमराव या शाळेत घडला. या शाळेने कायदेपंडित, धर्मसुधारक,
धम्मप्रवर्तक, पत्रकार, स्वराज्य-सेनानी इत्यादी चौफेर व्यक्तिमत्वाच्या
भिमारावांच्या शिक्षणाची सुरुवात या शाळेत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा
शाळा प्रवेश युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी
क्रांतिकारक घटना होती. बाबासाहेबांचे शिक्षण या शाळेत सुरू झाले नसते
तर... हा खरोखरच विचार आणि चिंता करायला लावणारा गूढ प्रश्न आहे.
.
बाबासाहेबांना
आंबेडकर हे आडनाव सुद्धा याच शाळेत मिळाले. त्या काळी लोकांना त्यांच्या
गावाच्या नावाने ओळखण्यात येई. त्यामुळे ‘आंबडवे’ या गावाचे ते आंबडवेकर
असे आडनाव तयार होत होते. तथापि, प्रेमाने स्वतःच्या शिदोरीतील घास देणारे
कृष्णाजी केशव आंबेडकर सारखे शिक्षकही येथेच त्यांना भेटले. त्यांचे
आडनावही त्यांच्या आंबेड या गावावरून तयार झाले होते. ते आडनाव सुटसुटीत
वाटल्याने त्यांनी बाबासाहेबांनापण सुचवले. तो पर्याय योग्य वाटल्याने
शाळेतील दाखल खारीज रजिस्टर मध्ये १९१४ क्रमांकावर तसे नोंदवण्यात आले.
शाळेत येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांचे काही शिक्षण घरीच घेतले
होते. त्यामुळे बाबासाहेब शाळेच्या त्या रजिस्टरमध्ये मोडी लिपीमधील
स्वाक्षरी करू शकले. लहानपणी त्यांचे नाव भीमा/भिवा असे होते. “भिवा रामजी
आंबेडकर” अशी स्वाक्षरी असलेले ते रजिस्टर शाळेने प्राणपणाने जपून व
लॅमिनेशन करुन ठेवले आहे. अभ्यागतांसाठी झेरॉक्स केलेल्या स्वरूपातील प्रत
तयार केलेली आहे. आंबेडकर गुरुजी मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहत.
बाबासाहेब १९४८ मध्ये मजूर मंत्री झाले, तेव्हा गुरुजींना भेटण्यासाठी
साताऱ्याला व्यंकटपुरातील घरी गेले होते.
.
हा
दिवस “विद्यार्थी दिवस” म्हणून जाहीर झाल्यामुळे या दिवसाला अधिकच उजाळी
आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्मभर विद्यार्थी होते. जन्मभर त्यांचा
प्रचंड अभ्यास सुरु होता. त्यांच्याइतका पुस्तकांचा व्यासंग जगत क्वचितच
कोणाचा असू शकेल. उपाशी राहून, पदरमोड करून, काटकसर करून त्यांनी एकेक पै
जमा करून त्यातून अनेक पुस्तके विकत घेतली. त्यांनी १९३० मध्ये वैयक्तिक
पुस्तकांसाठी राजगृहासारखी इमारत बांधली होती, त्यात सुमारे ५० हजार
ग्रंथांची संपदा होती. असे ग्रंथप्रेमाचे उदाहरण जगातही सापडत नाही.
.
अभ्यासू
बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम आदर्श आहेत. प्रज्ञा,
शील, करूणा यांचा त्यांच्यात झालेला संगम विद्यार्थ्यांना नक्कीच अनुकरणीय
आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर जोपासलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता,
वैज्ञानिक दृष्टीकोण इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये लहानपणीच रुजणे
आवश्यक आहे. सध्याचे शिक्षण हे विद्यार्थीकेन्द्री आहे. त्यामुळे या
दिनाच्या निमित्ताने त्याविषयीसुद्धा उहापोह केला जाईल. या दिनाच्या
निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांद्वारे बाबासाहेबंसारख्या
उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जास्त ओळख होत राहील.
.
येथे
२००० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला 100 वर्षे पूर्ण
झाल्याच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या शाळा प्रवेश
दिनाचे महत्व येथील तरुण पत्रकार अरुण विश्वंभर जावळे यांनी जाणले. ते
येथील प्रवर्तन चळवळीच्या माध्यमातून गेली १५ वर्षे ते या दिवसांचे महत्व
स्थानिक तसेच राज्य व देश पातळीवर लोकांना पटवून देत आहेत. त्यासाठी
भ्रमंती करीत आहेत. यासोबतच १५ वर्षांपासून दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी या
शाळेत व साताऱ्यात हा शाळा प्रवेश दिन ते साजरा करीत असतात. त्यांच्या त्या
कार्यक्रमाला भारतभाऱ्यातून मोठमोठ्या व अनेक व्यक्ती हजेरी लावत असतात व
येथील भूमीला आणि वास्तूला वंदन करीत असतात. त्यांच्या प्रयत्नामुळे
महाराष्ट्रभर इतर अनेक ठिकाणी काही वर्षांपासून बाबासाहेबांचा शाळा प्रवेश
दिवस साजरा केला जातोय.
.
यासोबतच
शासकीय पातळीवरून या दिवसाला मान्यता मिळावी यासाठी त्यांनी गेली अनेक
वर्षे प्रयत्न चालवले होते. निरनिराळे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सामाजिक
न्याय मंत्री व इतर लोकप्रतिनिधी यांच्या सतत भेटी घेणे, या दिवसाचे महत्व
समजावून सांगणे, त्याविषयी निवेदने देणे असे त्यांचे प्रयत्न सुरु होते.
२०१४ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने हा दिवस सातारा जिल्ह्यात सर्व
शाळांमध्ये साजरा करावा असा ठराव संमत केला होता. तसेच याविषयी राज्य
शासनास प्रस्ताव पाठवण्याचे सुद्धा ठरवण्यात आले होत. गेल्या वर्षी
बाबासाहेबांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त या प्रयत्नांना अधिकच वेग आणि
धार आली होती. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गेल्या वर्षी या
शाळेस भेट देऊन हा दिवस “बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन” म्हणून जाहीर
करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यावर्षी बाबासाहेबांच्या १२५ व्या
जन्मवर्धापन महोत्सवाचे निमित्त साधून या दिनाच्या विविध नावांवर विचार
होऊन “विद्यार्थी दिन” जाहीर केला गेला.
.
या
दिवशी शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध
स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात शासनादेशात
सांगण्यात आले आहे. हा दिवस अधिकाधिक शाळांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या
प्रकारे साजरा व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे, त्या दिवसाच्या
आधीच शाळांच्या मुख्याध्यापकांना भेटून त्यांना शासकीय परिपत्रकाची व या
दिवसाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या या
निर्णयाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटत आहेत. अनेक राज्यांमध्ये सुद्धा हा
दिवस “विद्यार्थी दिन” म्हणून राबवण्याची चर्चा आणि तयारी सुरु झाली आहे.
हा उत्स्फूर्त पुढाकार पहाता लवकरच इतर राज्यांमध्ये सुद्धा व केंद्रीय
स्तरावरून हा दिवस साजरा करण्याचे आदेश लवकरच निघू शकतील, असे दिसते.

Comments
Post a Comment